Friday, January 21, 2022

सिनौलीचे अवशेष छकड्यांचे कि वैदिक रथांचे?

सिनौलीचे अवशेष छकड्यांचे कि वैदिक रथांचे?
 

सिनौली येथे झालेल्या उत्खनानामुळे आर्यांचा प्रश्न निकालात निघाला असून वैदिक संस्कृती येथे सनपूर्व २२०० पासून असल्याचे सिद्ध झाले तर आहेच, सिनौली येथे सापडलेले रथांचे अवशेष आणि शस्त्रास्त्रे महाभारत युध्द खरेच घडले असावे याचा पुरावा आहेत असे दावे केल्याचे आपण ऐकत असतो. आता तर डिस्कवरी वाहिनिवर दावे खरे मानून “सिक्रेट्स ऑफ सिनौली” ही डॉक्यूमेंटरी बनवण्यात आली जिने वरील दाव्यांना बळकट करायला बराच हातभार लावला. खरे तर पुरातत्व खाते ज्ञानात निष्पक्ष भर घालण्यासाठी असते याचा विसर २०१४ पासून पुरातत्व खात्याला पडला आहे हे राखीगढी येथे झालेल्या उत्खननापासून ते घग्गर नदीला सरस्वती घोषित करण्यापर्यंतच्या उपद्व्यापातून आपण पाहू शकतो. सिनौली येथील उत्खनन आणि त्यावरून काढले गेलेले अशास्त्रीय निष्कर्ष यावरून तीच बाब पुन्हा सिद्ध होते.

 
गंगा-यमुनेच्या दोआबातील बागपतजवळील सिनौली येथे २००५-६ साली झालेल्या उत्खननात इसपु २२०० ते इसपू १८०० या दरम्यानची दफनभूमी सापडली होती. त्यात शंभराहून अधिक  दफने मिळाली. दफनात मृतांसोबत मृद्भांडी, तांब्याच्या बांगड्या, मृण्मयी प्रतिमा, तांब्याच्या दोन तलवारी, सोन्याचे काही दागिने इ. वस्तू मिळून आल्या.  दफनभूमीला घेरणा-या भाजलेल्या विटांच्या भिंतीचेही अवशेष मिळाले. या दफनांचे हडप्पा येथे मिळून आलेल्या उत्तरकालीन दफनांशी साधर्म्य असल्याचे पुरातत्व खात्याचे सिनौली उत्खननाचे प्रमुख डी. व्ही. शर्मा यांनी घोषित केले. नंतर बराच काळ सिनौली येथे नवे उत्खनन झाले नाही.

२०१८ मध्ये या प्राचीन दफनभूमीजवळच उत्खननाचा दुसरा टप्पा संजय मंजुळ या पुरातत्व खात्याच्या अधिका-याच्या नेतृत्वाखाली सुरु झाला. या उत्खननात तांब्याच्या नक्षीदार पत्र्याने आच्छादित केलेल्या लाकडी शवपेट्यातील तीन दफने मिळाली तसेच मृतांसोबत पुरलेल्या छकडेसदृश गाड्यांचेही अवशेष मिळाले. एका शवपेटीवरील तांब्याच्या पत्र्यावर पिंपळपान आणि बैलाच्या शिंगांचे शिरस्त्राण-सदृश अथवा बैलाचे मस्तक सूचित करणारी आकृती कोरलेली मिळाली. एका शवपेटीत स्त्रीचे शव पुरलेले असून तिच्या हातावर गोमेद जडवलेला बाजूबंद सापडला.

 जे गाड्यांचे अवशेष आहेत त्यांना तांब्याची त्रिकोण ठोकलेली नक्षीदार पण भरीव लाकडी चाके आहेत. गाडीचा कणा लाकडाचा असून तोही तांब्याच्या पत्र्याने मढवलेला आहे. या दफनांचा काळ ताम्रयुगातील  सनपूर्व २००० ते सनपूर्व १८०० असल्याचे अनुमानित करण्यात आले आहे. यावरून मंजुळ यांनी लगेचच दक्षिण आशियात एवढ्या जुन्या काळातील ‘आर्य तंत्रज्ञाना’ने बनवलेले रथ प्रथमच आढळून आले असून दफनेही वैदिक विधीविधानानुसारच असून हे अवशेष महाभारतकाळातील असू शकतील अशी विधाने केली. रथ सापडल्याने एवढ्या जुन्या काळात भारतात घोडेही होते हे सिद्ध होत असल्याने आर्य स्थलांतर सिद्धांत बाद ठरतो असे दावेही काही विद्वानांनी केले. शिवाय बागपत, सोनपत आदि ठिकाणे महाभारत युद्धाशी संबंधीत असल्याने ही शाही दफने लढवैय्या लोकांची (म्हणजेच क्षत्रियांची) असू शकतील हा दावाही सोबत केला गेलाच. आपण आता वस्तुस्थिती पाहू.

पहिली बाब म्हणजे दफनपेटीवर  बैलाच्या मस्तकाचे चिन्ह आहे, घोड्याचे नाही. म्हणजेच सिनौलीतील लोकांना बैल माहित होते, घोडे नाहीत. आणि रथ घोडे ओढतात, बैल नाही. आर्यांच्या दफनांत प्रेतासोबत रथ व त्याला जुंपलेले घोडेही दफन केले जात असे पुरावे अन्द्रोनोवो, सिंथास्ता संस्कृती व लुयोंग येथील आर्य दफनांत मिळाले आहेत. या दफनांत प्रेते ही रथाच्या बैठकीच्या जागेवर ठेवलेली असून त्यात शवपेट्यांचा वापर नाही. ही सर्व स्थाने मध्य आशियात मोडतात जेथून इंडो-युरोपियन म्हणजे आर्य इराणमध्ये व तेथून भारतात आले असे मानले जाते. ही दफने इसपू दोन हजार नंतरची आहेत.

 सिनौली येथे दफनासोबत छकडा आहे पण घोडा (अथवा बैलही) पुरलेला नाही. आणि महत्वाची बाब म्हणजे मध्य आशियातील दफनांतील रथांची संरचना सिनौलीच्या छकड्यांप्रमाणे नसून सर्वस्वी वेगळी तर आहेच पण चाकेही भरीव नसून आरे असलेली आहेत. भरीव चाकांचे रथ जगात कोठेही नसतात कारण वजन वाढते. त्यामुळे सिनौली येथील सापडलेल्या भरीव चाकाच्या गाड्यांना युद्धात वापरले जाणारे वेगवान रथ ठरवायचा प्रयत्न करणे हा सामान्य ज्ञानाचाही भाग नसल्याचे चिन्ह आहे.

 मंजुळ मात्र ठासून सांगतात कि सिनौली येथील दफने वैदिक पद्धतीची आहेत. हेही धादांत असत्य यासाठी आहे कि शवपेटीत दफन करण्याचा एकही उल्लेख वैदिक साहित्यात नाही. पण उत्तरसिंधू काळात मात्र अशी दफने आढळलेली आहेत. ऋग्वेदात रथांचे जेही उल्लेख आहेत ते आ-यांच्या चाकांच्या रथांचे आहेत, भरीव चाकांचे नाहीत. सिंधू संस्कृतीत इसपू ३१०० पासून भरीव चाकांच्या बैलगाड्यांचाच वापर होत असल्याचेही पुरावे उपलब्ध आहेत. शिवाय सिनौली येथे जी मृद्भांडी, अलंकार, बैलाचे मस्तक  व पिंपळपानाच्या आकृती मिळाल्या आहेत त्याही सिंधू संस्कृतीत मिळणा-या अवशेषांशी मेळ खातात. म्हणजेच सिंधू संस्कृतीचा विस्तार गंगेच्या खो-यापर्यंत झाल्याचा पुरावा सिनौली येथील अवशेष देतात. वैदिक संस्कृती तेथे अस्तित्वात असल्याचा नाही हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

दुसरी बाब म्हणजे सिनौली येथील मृतांचा महाभारत युद्धाशी संबंध असल्याबद्दलचा दावा. हे अवशेष सापडले तो परिसर कुरुक्षेत्राचा भाग मानला जातो. आता महाकाव्यातील युद्धाची आणि या अवशेषांची सांगड घालून युद्ध तर खरेच झाले पण ही क्षत्रियांची शाही दफने आहेत असा दावा वैदिक धर्माभिमान्यांनी करणे स्वाभाविक मानले तरी ते हे विसरतात कि या दफनांतील सांगाडे हे युद्धात मेलेल्यांचे नसून नैसर्गिक मरण आलेल्यांचे आहेत. या दफनांत एक वर्षाच्या मुलापासून ते वृद्ध स्त्री-पुरुषांचेही सांगाडे सामाविष्ट आहेत. दुसरे म्हणजे दफनात तलवारी वगैरे शस्त्रे सापडली असली तरी धनुष्यबाणाचा एकही पुरावा सापडलेला नाही. भारतयुद्धात तर धनुष्य हेच मुख्य साधन वापरल्याचे उल्लेख आहेत. मग त्या मृतांचा संबंध महाभारत युद्धातील मृतांशी कसा लावता येईल?

 सिनौली येथील दफनभूमी ही ताम्रयुगीन आहे. लोखंडाचा शोध तोवर लागलेलाच नव्हता. पण ऋग्वेदाला लोखंड माहित होते म्हणजे ऋग्वेद लोहयुगात, (इसपू १५०० नंतर) लिहिला गेला.  तरीही सिनौली येथील अवशेषांचा संबंध वैदिक आर्यांशी जोडत त्यांना येथलेच ठरवायचा प्रयत्न करणे अशास्त्रीय व वर्चस्वतावादी धोरणाचा परिपाक आहे.

 उलट सिनौली येथील अवशेष आपल्याला ओरडून सांगत आहेत कि सिंधू संस्कृतीचा विस्तार समजला जातो तेवढाच नसून ती गंगा-यमुनेच्या खो-यापर्यंत किंवा त्याही पार पसरलेला होता. तीत काही स्थानिक वैशिष्ट्येही होती. गंगा-यमुनेच्या दोआबात राहणा-या पुरातन जमातींनी ती आपली स्वतंत्र वैशिष्ट्ये आपल्या दफनपद्धतीत कायम ठेवली. त्या काळात जगभरातील सर्व जमातींना संरक्षण-आक्रमणासाठी युद्धसज्ज रहावेच लागे. किंबहुना तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असे. दफनांत  शस्त्रे सापडली म्हणून त्यांना लगेच वैदिक क्षत्रीय ठरवायचा बादरायणी प्रयत्न संघीय विद्वान करू धजत असले तरी तज्ञांनी तसे करणे अक्षम्य आहे. यामुळे सिनौलीच्या अवशेषांचा खरा अन्वयार्थ समजून घेतला जाणार नाही. आपले प्राचीन पूर्वज आणि त्यांच्या जगण्याच्या पद्धतीवर खरा प्रकाश पडणार नाही. लबाड्या करून वर्चस्ववादी बनता येईल पण ज्ञानपरंपरेची अक्षम्य हानी होईल!

-संजय सोनवणी

Wednesday, March 31, 2021

गेले ते बालपणाचे रम्य दिवस... उरल्या फक्त आठवणी

🚩🌹👏🙌👋✋ आपडी-थापडी ✋👋🙌👏🌹🚩

🙌 परवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर रेललेले. आजीही त्यांच्यातीलच एक होऊन गेल्या होत्या. मुलांना त्या बहुधा गोष्टी सांगत असाव्यात. गोष्टींना कंटाळलेल्या मुलांनी एकच गिल्ला सुरू केला... 

🙌 आजी, आजी  ऽ आपडी- थापडी खेळू ना गं. 🙌

🙌 रस्त्याने चाललेला मी 🙌'आपडी थापडी'🙌 ऐकताच थबकलो. ही आपडी-थापडी पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी माझ्या बालमुठीतून घरंगळून गेली होती. मधल्या काळात मोठे होणे काय असते, ते पुरेपूर अनुभवले, त्याचे चटके सोसले. 
👫 हरवलेल्या बालपणासोबत खूप काही हरवले, पण ही ‘आपडी थापडी’ मेंदूच्या कोठल्या तरी कोपऱ्यात तशीच राहिली. मधल्या काळात माझे लग्न झाले. मला मुले झाली, पण त्यांच्याशी मला कोठे खेळता आली ही ‘आपडी-थापडी’ सारखी अवीट जोडीची 'खेळगाणी'? 
🙌 मी मला काळाच्या बदलात केवळ ढकलत राहिलो, पुढे पुढे; पण बालपणीचे किती मोठे वैभव, त्या फुलपंखी दिवसांतील गमतीजमती, ते खेळ, ती गाणी, सारे तेथल्या तेथे सोडून आलो. 

🙌 त्या 'आपडी-थापडीच्या' खेळाने मला माझ्या बालपणात नेऊन सोडले. रस्त्याने जात होतो, पण माझा पाय जागेवरून हलेना. मला त्यांची ‘आपडी-थापडी’ पाहायची होती. बिनपैशांचा तो आनंदआपल्या आयुष्या  तून निघून गेला आहे. मी लहान होऊन तो पकडू पाहत होतो. 

🙌 कोणी काय म्हणेल याची पर्वा न करता मी त्या आजी-नातवंडांच्या खेळाकडे बघू लागलो. मुलांनी कोंडाळे केले होते. आजीसमोर प्रत्येकाने त्यांच्या छोट्या छोट्या हातांचे पंजे एकमेकांवर पालथे ठेवले होते अन् सुरू झाली...

 (१) 
 🙌 आपडी-थापडी... 🙌
        गुळाची पापडी 
        धम्मक लाडू.... 
        तेल पाडू 
        तेलंगीच्या.... 
        तीन पुऱ्या 
        चाकवताचं.... 
        एकच पान 
        धर गं बेबी.... 
        हाच कान' 

🙌 आजी मुलांच्या पालथ्या हातांवर क्रमाक्रमाने उलटापालटा हात थोपटत गाणे म्हणत होती. 
🙌 'धर गं बेबी हाच कान' म्हणताच त्या छोट्या छोट्या बोटांनी एकमेकांचे कान पकडले, आजीचेही पकडले. कान धरून, ते सारे कोंडाळे झुलू लागले आणि पुढचे गाणे सुरू झाले. 

(२)
🙌'च्याऊ म्याऊ पितळीचं पाणी पिऊ भुर्रर्रर्रकन उडून जाऊ'🙌
असे म्हणत सर्वांनी त्यांचे कानांवरील हात सोडून हवेत फडकावले. जसे छोटे छोटे पक्षीच उडाले. 
🙌 मी तल्लीन झालो होतो. माझे मला मी रस्त्यात उभा राहून मुलांच्या खेळात रमलो आहे याचे भानही उरले नव्हते. मला माझे निसटून गेलेले बालपण त्या खेळगाण्यांतून पुन्हा मिळाले होते. माझ्यातील लहान मूल त्या ‘आपडी-थापडी’ ने जागवले होते. माझ्या डोळ्यांपुढून माझे खेड्यात गेलेले बालपण सरकू लागले. संध्याकाळी शाळेतून आले, पाटी-दप्तर घरात भिरकावले, की आम्ही खेळायला मोकळे! गरिबी सगळ्यांच्याच घरी होती. आजूबाजूचे सगळे मित्रही त्याच परिस्थितीतील. आमचे खेळही खर्चिक नव्हते. सगळे तोंडभांडवल किंवा अंगमेहनत असा व्यायाम घडवणारे...

ओट्यावर बसलेली आजी दोन्ही हातांनी डोळे झाकायची अन्
 म्हणायची...

(३)
'आया भोया
पाटीभर लाह्या
वाघाचं पिल्लू
छुप गया.....'

🙌 मग सुरू व्हायची त्याच्या लपलेल्या सवंगड्यांची लपाछपी. वाघाच्या पिल्लावर राज्य आलेले. तो मग इकडे तिकडे कानाकोपऱ्यात शोधीत फिरे. पहिल्यांदा जो सापडला त्याच्यावर राज्य. पुन्हा त्याचे डोळे झाकून 
'आया भोया' सुरू!....
एका खेळाने कंटाळले, की दुसरा खेळ. असेच अन् या सगळ्या खेळांभोवती काही काही गाणी असतच. त्याचे तेव्हा काही वाटत नसे - आज आठवून मोठी गंमत वाटते. आराधरीचा खेळ खेळताना सगळे गडी गोल रिंगण करून जाळी धरत. जाळी धरली, की कोणावर राज्य येणार यासाठी 
मग हे गाणे सुरू व्हायचे

(४)
'इरिंग मिरिंग
लवंगा तिरिंग
लवंगा तिरीचा
डुगडुग बाजा
गाई गोपी उतरला राजा...
उतरला राजा'

🙌 आणि गंमत अशी, की जो राजा बनून उतरायचा त्याच्यावरच राज्य आलेले असायचे. आराधरीत खूप पळापळ व्हायची. हुलकावण्या देत पळणाऱ्यांपैकी कोणा एकाला पकडलं, की त्याच्यावर राज्य!....

मुलींची गाणी आणखी वेगळीच असत- 

(५)
इत्ता इत्ता पाणी
गोल गोल राणी...!!
म्हणत मुलींचे खेळ रंगत. एरवी भित्र्या, काकूबाई असणाऱ्या मुली खेळताना किती धीट होत!

(६)
'कोरा कागद निळी शाई
आम्ही कोणाला भीत नाही
दगड का माती?'
 हा दगड-मातीचाही खेळ छानच होता. दगड म्हटले, की मातीवर उभे राहायचे अन माती म्हटले, की दगडावर! धमाल यायची....!!

🙌 आकाशात विमानाचा घरघर आवाज ऐकू येऊ लागला, की सगळी बच्चेकंपनी विमान पाहायला अंगणात जाई. आभाळात विमानाचा शोध सुरू होई. ते विमान साखळी सोडून लहान मुलांना विमानात बसवून घेते असाही काहीतरी समज होता...

(७)
'ईमान ईमान साखळी सोड...'
असेही त्या आकाशात उडणाऱ्या विमानकडे पाहून म्हणत असू. जेव्हा एसटीतही क्वचितच बसायला मिळे त्या काळातील ती कल्पना!...

🙌 संध्याकाळी आभाळातून बगळ्यांची माळ हमखास उडताना दिसे, मग आम्ही हे गाणे बड बडत असू...

(८)
'बगळ्या बगळ्या कवडी दे, धारणगावची नवरी दे'
असे नखांवर नखे घासून गाणे म्हणत असू. 
नखांवर तेव्हा तांदळाच्या कणीसारखे काहीतरी डाग असत. अनेक मुलांच्या नखांवर ते असत. त्यालाच आम्ही कवड्या म्हणत असू. बगळे आपले उडत जायचे, पण आम्हाला मात्र कवड्या मिळालेल्या असत, नखांवर...!!

🙌 आकाशात ढग भरून आले, की पावसाचे वातावरण तयार होई. 
मातीचा मस्त सुवास, 
गार वारा सुटलेला, 
अशा वेळी अंगणात गोल गोल फिरत...

(९)
'येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा 
पाऊस आला मोठा 
येगं येगं सरी 
माझे मडके भरी 
सर आली धावून
मडके गेले वाहून'

हे पावसाचे गाणे तर त्या पिढ्यांतील प्रत्येकानेच त्या त्या वेळी म्हटले आहे. पाऊस पडून गेल्यानंतर अंगणातील मऊ वाळूचे खोपे तयार करण्याची लगबग सुरू होई. पायाच्या पावलावर पावसाने मऊ झालेली माती थापून आभाळाला वाकुल्या दाखवत वाळूची घरे बनवत असू. घर हळूच पाऊल काढताना अनेकदा पडून जाई, तर कधी कधी खोपा बने. तो आनंद शब्दांच्या पली कडचा...

🙌 आम्ही नवरात्रात गावाबाहेरच्या वडजाई देवीला जात असू. रस्त्यात आजूबाजूला खळगी होती. त्या खळग्यांमध्ये इंगळ्यांची बिळं असत. आम्ही त्या बिळांतून विषारी इंगळ्या काढून त्यांची झुंज लावण्याचा थरारक जीवघेणा खेळही त्या नकळत्या वयात खेळत असू. इंगळी काढण्याचा आमचा एक मंत्र होता. आम्ही करवडाचा फोक हातात घेऊन तो इंगळीच्या बिळावर घासत असू. काडीने घासताना बिळातून माती-खडे आत पडत. 
तोंडाने मंत्र सुरू...

(१०)
इंगळी का पिंगळी सलाम करती,सलाम करती,,
अण्णाजी पाटलाला बोलीती बोलीती
सुया मारुनी मंत्र फुकिती 
मंत्र फुकिती......' 
मंत्र म्हणून पुरा होण्याच्या आतच चवताळलेली इंगळी काडीला डंख देत बाहेर येई. कमरेचा करगोटा तोडून, फास मारून इंगळीची नांगी बांधून तिला दुसऱ्या बिळात सोडण्यात येई. पहिली इंगळी दुसरीला बाहेर काढून बरोबर घेऊन येई. तो थरारक खेळ आठवून अंगावर काटा येतो. 

🙌 थोड्याच दिवसांत दिवाळीची नवलाई येई. हातात सुरसुऱ्या घेऊन...

(१२).
'दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या
लक्षुमणाच्या'
असे म्हणत सुरसुऱ्या ओवाळीत दिवाळीचे गाणे म्हटले जाई. दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी सहामाही परीक्षा असे. तिचे ओझे वाटायचे. दिवाळीच्या आनंदापूर्वी केवढा मोठा अडथळा!!

🙌 शाळा नेहमी खेळण्याच्या आड येते असे वाटायचे. 
मग शाळा सुटली की कोण आनंद...

(१३)
शाळा सुटली पाटी फुटली...
आई मला भज्यानं मारलं, त्याच्या काय बापाचं खाल्लं...

🙌 आम्ही लहानपणी असे एक रडगाणेही म्हणत असू. घरातील लहान मुले सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या बहिणीभावांकडे असे. तशा वेळी मोठी बहीण आईची जागा घेत असे. ती तिच्या भावंडांना खेळवताना...

(१४)
'इथं इथं नाच रे मोरा
बाळ देई चारा
चारा खा...
पाणी पी...
भुर्रर्र उडून जा...'
अशी गाणी म्हटली जात..!
लहानग्याचे कौतुक करताना, त्याला तीट लावताना...

(१५)
'अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा तीटट् लावू'
असे छान गाणे म्हटले जाई...
लहान मुलांचे संगोपन करताना अशी अनेक गाणी गात त्यांचे बालपण फुलवले जाई. खेळगाण्यांनी तेव्हाचे आमचे बालपण व्यापून टाकलेले होते...!!
ती गाणी एका पिढीकडून दुसरीकडे आपोआप हस्तांतरित होत होती. त्यासाठी वेगळे काही करावे लागत नव्हते. 

🙌 मोठी ताई लहानग्या भावाला खेळवताना उताणी झोपून त्याला पायावर बसवी व पायाला झोका देत, खालीवर करत त्याच्याशी ‘हाट घोडा हाट’ खेळू लागे...

(१६)
'हाट घोडा हाट,
बाजाराची वाट
बाजाराला कोण जातं
दादा वहिनी
घरी कोण राहतं 
आम्ही दोघी बहिणी...

असे खेळता खेळता बहिणी भावांचे मेतकुट जमे...!!
ब-याचदा लहान मुले मुलींच्या मध्येच खेळत. बहिणीच्या मैत्रिणींमध्ये मुलगा खेळू लागला, की...

'पोरींमध्ये पोरगा भाजून खातो कोंबडा...'

असे त्याला चिडवले जाई..!!
कधी एकमेकांना पाठीवर घेत हे गाणे गायचे...

(१७)
'वऱ्हाटा का पाटा
गोल गोल वाटा'

असा वऱ्हाट्या-पाट्याचा खेळ सुरू होई..!!
मुलींचे 'अपलम-चपलम' सागरबिट्ट्या, ठिकरा-ठिकरी
असे खेळही रंगत.

🙌 ते खेळ खेळताना म्हटली जाणारी खेळगाणी हीच आमच्या पिढीची बडबडगीते होती. ती म्हणत आमचे बालपण समृद्ध झाले. पण आम्ही तो वारसा पुढील पिढीकडे पोचवायला कमी पडलो. ती साखळी आमच्या पिढीशी काळाच्या बदलांमध्ये येऊनच तुटली त्याचे दुःख मोठे आहे. 

🙌 मला त्या आपडी थापडी वाल्या आजींचा हेवा वाटला. कौतुकही वाटले. त्यांनी त्यांचं हरवलेलं बालपण मुलांत मूल होऊन आपडी-थापडी खेळताना पुन्हा जिवंत केले होते...!!
मुलांनी हट्ट धरला तेव्हा त्यांनी गाणे म्हणायला सुरुवात केली...

(१८)
'बगळ्या बगळ्या नाच रे,
तुझी पिल्लं पाच रे
एक पिल्लू मेलं
गाडीत घालून नेलं, 
गाडी गेली डोंगराला, 
आपण जाऊ बाजाराला, 
बाजारातून आणल्या पाट्या, 
साऱ्या मुलांना वाटल्या...

(१९)
 'एक मूल चुकलं
छडी खाली लपलं
छडी लागे छमछम
विद्या येई घमघम'
मला छमछम छडी आठवली, चिमुकल्या हातांवरचे ते छडीचे वळ घमघमणाऱ्या विद्येकडे घेऊन गेले. 

🙌 प्रतिकूलतेतून मिळणारा आनंद शोधणारे आमचे बालपण कितीतरी समृद्ध होते! 
🙌 बदल होणार आहेतच. मात्र आमच्या पिढीने जे अनुभवले, ते नव्या पिढीला आम्ही नाही देऊ शकलो. 
🙌 आम्ही पुढच्या पिढीला भौतिक सुखे मनमुराद देऊ केली. 
🙌 आम्हाला बालपणी जे मिळाले नाही, ते सुख मुलांना पैशाच्या माध्यमातून नको तितके देण्याचा प्रयत्न केला - पण देण्याजोगे बरेच काही न देताच. 
🙌 त्यातील ती खेळगाणी राहूनच गेली द्यायची.

😍😍

Monday, February 21, 2011

भूपाळी - घनश्याम सुंदरा

घन:श्याम सुंदरा ही अमर भूपाळी लिहिणारा होनाजी हा गवळी समाजात जन्माला आला. तो त्याच्या घराण्याचा दुधाचा व्यवसाय करीत असे. पेशव्यांच्या वाडय़ावर सकाळी दुधाचा रतीब घालणे आणि सायंकाळी लावणी गाऊन, तमाशा करुन प्रसंगविशेषी त्यांचे तसेच इतरेजनांचेही मनोरंजन करणे हे दोन्ही उद्योग होनाजीने केले.

त्याचा गवळ्याचा व्यवसाय जसा वंशपरंपरागत तसाच शाहिरीचा व्यवसायही वंशपरंपरागतच. त्याचे आजोबा साताप्पा किंवा शांताप्पा हे आणि त्याचा चुलता बाळा हे दोघे नामांकित शाहीर होते. विशेषत: होनाजीचा चुलता बाळा हा बाळा बहिरु या नावाने शाहिरी क्षेत्रात प्रसिद्ध होता. बहिरु नावाचा रंगारी हा बाळाचा मित्र होता आणि ते दोघे बाळा बहिरु या नावाने तमाशाचा फड चालवीत. बाळा बहिरुची हीच परंपरा जणूकाही होनाजीने चालविली. 



भूपाळी - घनश्याम सुंदरा 
शाहीर : होनाजी बाळा

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ।
उठीं लवकरि वनमाळी ! उदयाचळीं मित्र आला ॥ ध्रु ॥
सायंकाळी एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं ।
अरुणोदय होतांचि उडाले चरावया पक्षी ।
अघमर्षणादि करुनि तापसी तपाचरणदक्षी ।
प्रभातकाळीं उठुनि कापडी तीर्थपंथ लक्षी ।
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेउनि कुक्षीं ।
यमुनाजळासी जाती मुकुंदा ! दध्योदन भक्षीं ॥
मुक्तता होऊं पाहे । कमळिणीपासुनियां भ्रमरा ॥
पूर्वदिशे मुख धुतलें । होतसे नाश तिमिरा ॥
उठिं लवकरि गोविंदा । सांवळ्या नंदकुमारा ।
मुखप्रक्षालन करीं अंगिकारी भाकर -काला ॥ १ ॥
घरोघरी दीप अखंड त्यांच्या सरसावुनि वाती ।
गीत गाति सप्रेमें गोपी सदना येति जाती ॥ 
प्रवर्तोनि गृहकर्मी रंगावळि घालूं पाहती ।
आनंदकंदा ! प्रभात झाली उठ सरली राती ॥
काढीं धार क्षीरपात्र घेउनि धेनू हंबरती ।
द्वारी उभे गोपाळ तुजला हांक मारुनि बाहती ॥
हे सुमनहार कंठी । घालि या गुंजमाळा ।
हाती वेत्रकाष्ठ बरवें । कांबळा घेइं काळा ॥
ममात्मजा मधुसूदना । ह्रुषीकेशी जगत्पाळा ।
हंबरताति वांसरे हरि धेनुस्तन-पानाला ॥ २ ॥
प्रातः स्नाने करुनि गोपिका अलंकार नटती ।
कुंकुमादि चर्चुनी मंथनालागिं आरंभिती ।
प्रेमभरित अंतरांत वदनीं नामावळि गाती ।
अर्घ्यदान देउनियां द्विजजन देवार्चन करिती ॥
नेमनिष्ठ वैष्णव ते विष्णु-पूजा समर्पिती
स्मार्त शिवार्चनसक्त, शक्तितें शाक्त आराधिती ॥
ऋषिगण आश्रमवासी । जे कां निरंजनी धाले ।
अरुनोदय होतांचि । आपुले ध्यानिं मग्न झाले ॥
पंचपंच-उषःकालीं । रविचक्र निघों आलें ।
येवढा वेळ निजलासिम्हणुनि हरि कळेल नंदाला ॥ ३ ॥
विद्यार्थी विद्याभ्यासास्तव सादर गुरुपायी ।
अध्यापन गुरु करिति शिष्यही अध्यायना उदयीं ॥
याज्ञिकजन कुंडांत आहुती टाकिताति पाहीं ।
रविप्रभा पडुनियां उजळल्या शुद्ध दिशा दाही ॥
हे माझे सावंळे पाडसे उठिं कृष्णाबाई ।
सिद्ध सवें बळिराम घेउनि गोधनें वना जाई ॥
मुनिजनमानसहंसा । गोपीमनःकमलभृंगा ।
मुरहर पंकजपाणी । पद्मनाम श्रीरंगा ॥
शकटांतक सर्वेशा । हे हरि प्रतापतुंगा ।
कोटिरवींहुनि तेज आगळें तुझिया वदनाला 
होनाजी बाळा नित्य ध्यातसे ह्रुदयि नाममाळा ॥ ४ ॥

Tuesday, October 9, 2007

अठरा विश्वे दारिद्र्य

आपल्या मराठीत एक म्हण आहे "अठरा विश्वे दारिद्र्य"
मी सहज विचार केला की अठरा विश्वे फिरला तरी दरिद्री तो दरिद्रीच अशा अर्थाच्या या म्हणीचा उगम कशात असेल?
आज विज्ञानाने हे सिद्ध झाले आहे की एकूण १८ आकाशगंगा आपल्याला पाहता येतात.
म्हणजे या विश्वात अनेक आकाशगंगा आहेत. पण एकूण अठराच आकाशगंगांचा भौतिकदृष्ट्या शोध लागलेला आहे. त्यातील ऍन्ड्रोमेडा म्हणजेच देवयानी ही आकाशगंगा आपल्यापासून सर्वात जवळ आहे

पण आपली ही म्हण तर विज्ञानाने हा निष्कर्ष काढायच्या अगोदरपासूनच कित्येक शतके प्रचलित आहे.यावरुन असा निष्कर्ष निघतो का? की आपल्या पूर्वजांकडे ही माहीती होती की आपल्यासारखी एकूण १८ विश्वे (म्हणजेच आकाशगंगा) अस्तित्त्वात आहेत
जुनं ते सोनं असतं हेच खरं असं वाटायला बराच वाव आहे. 🙂
सागर

Wednesday, October 3, 2007

जुनं ते सोनं

वाचकहो,
जुनं ते सोनं असतं अशी आपल्या माय मराठीत एक म्हण आहे, या ब्लॉगच्या माध्यमातून मराठी संस्कृतीच्या जुन्या आणि बहुमोलाच्या गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा हा अल्पसा प्रयत्न
- सागर