सिनौलीचे अवशेष छकड्यांचे कि वैदिक रथांचे?
सिनौली येथे झालेल्या उत्खनानामुळे आर्यांचा प्रश्न निकालात निघाला असून वैदिक संस्कृती येथे सनपूर्व २२०० पासून असल्याचे सिद्ध झाले तर आहेच, सिनौली येथे सापडलेले रथांचे अवशेष आणि शस्त्रास्त्रे महाभारत युध्द खरेच घडले असावे याचा पुरावा आहेत असे दावे केल्याचे आपण ऐकत असतो. आता तर डिस्कवरी वाहिनिवर दावे खरे मानून “सिक्रेट्स ऑफ सिनौली” ही डॉक्यूमेंटरी बनवण्यात आली जिने वरील दाव्यांना बळकट करायला बराच हातभार लावला. खरे तर पुरातत्व खाते ज्ञानात निष्पक्ष भर घालण्यासाठी असते याचा विसर २०१४ पासून पुरातत्व खात्याला पडला आहे हे राखीगढी येथे झालेल्या उत्खननापासून ते घग्गर नदीला सरस्वती घोषित करण्यापर्यंतच्या उपद्व्यापातून आपण पाहू शकतो. सिनौली येथील उत्खनन आणि त्यावरून काढले गेलेले अशास्त्रीय निष्कर्ष यावरून तीच बाब पुन्हा सिद्ध होते.
गंगा-यमुनेच्या दोआबातील बागपतजवळील सिनौली येथे २००५-६ साली झालेल्या उत्खननात इसपु २२०० ते इसपू १८०० या दरम्यानची दफनभूमी सापडली होती. त्यात शंभराहून अधिक दफने मिळाली. दफनात मृतांसोबत मृद्भांडी, तांब्याच्या बांगड्या, मृण्मयी प्रतिमा, तांब्याच्या दोन तलवारी, सोन्याचे काही दागिने इ. वस्तू मिळून आल्या. दफनभूमीला घेरणा-या भाजलेल्या विटांच्या भिंतीचेही अवशेष मिळाले. या दफनांचे हडप्पा येथे मिळून आलेल्या उत्तरकालीन दफनांशी साधर्म्य असल्याचे पुरातत्व खात्याचे सिनौली उत्खननाचे प्रमुख डी. व्ही. शर्मा यांनी घोषित केले. नंतर बराच काळ सिनौली येथे नवे उत्खनन झाले नाही.
२०१८ मध्ये या प्राचीन दफनभूमीजवळच उत्खननाचा दुसरा टप्पा संजय मंजुळ या पुरातत्व खात्याच्या अधिका-याच्या नेतृत्वाखाली सुरु झाला. या उत्खननात तांब्याच्या नक्षीदार पत्र्याने आच्छादित केलेल्या लाकडी शवपेट्यातील तीन दफने मिळाली तसेच मृतांसोबत पुरलेल्या छकडेसदृश गाड्यांचेही अवशेष मिळाले. एका शवपेटीवरील तांब्याच्या पत्र्यावर पिंपळपान आणि बैलाच्या शिंगांचे शिरस्त्राण-सदृश अथवा बैलाचे मस्तक सूचित करणारी आकृती कोरलेली मिळाली. एका शवपेटीत स्त्रीचे शव पुरलेले असून तिच्या हातावर गोमेद जडवलेला बाजूबंद सापडला.
जे गाड्यांचे अवशेष आहेत त्यांना तांब्याची त्रिकोण ठोकलेली नक्षीदार पण भरीव लाकडी चाके आहेत. गाडीचा कणा लाकडाचा असून तोही तांब्याच्या पत्र्याने मढवलेला आहे. या दफनांचा काळ ताम्रयुगातील सनपूर्व २००० ते सनपूर्व १८०० असल्याचे अनुमानित करण्यात आले आहे. यावरून मंजुळ यांनी लगेचच दक्षिण आशियात एवढ्या जुन्या काळातील ‘आर्य तंत्रज्ञाना’ने बनवलेले रथ प्रथमच आढळून आले असून दफनेही वैदिक विधीविधानानुसारच असून हे अवशेष महाभारतकाळातील असू शकतील अशी विधाने केली. रथ सापडल्याने एवढ्या जुन्या काळात भारतात घोडेही होते हे सिद्ध होत असल्याने आर्य स्थलांतर सिद्धांत बाद ठरतो असे दावेही काही विद्वानांनी केले. शिवाय बागपत, सोनपत आदि ठिकाणे महाभारत युद्धाशी संबंधीत असल्याने ही शाही दफने लढवैय्या लोकांची (म्हणजेच क्षत्रियांची) असू शकतील हा दावाही सोबत केला गेलाच. आपण आता वस्तुस्थिती पाहू.
पहिली बाब म्हणजे दफनपेटीवर बैलाच्या मस्तकाचे चिन्ह आहे, घोड्याचे नाही. म्हणजेच सिनौलीतील लोकांना बैल माहित होते, घोडे नाहीत. आणि रथ घोडे ओढतात, बैल नाही. आर्यांच्या दफनांत प्रेतासोबत रथ व त्याला जुंपलेले घोडेही दफन केले जात असे पुरावे अन्द्रोनोवो, सिंथास्ता संस्कृती व लुयोंग येथील आर्य दफनांत मिळाले आहेत. या दफनांत प्रेते ही रथाच्या बैठकीच्या जागेवर ठेवलेली असून त्यात शवपेट्यांचा वापर नाही. ही सर्व स्थाने मध्य आशियात मोडतात जेथून इंडो-युरोपियन म्हणजे आर्य इराणमध्ये व तेथून भारतात आले असे मानले जाते. ही दफने इसपू दोन हजार नंतरची आहेत.
सिनौली येथे दफनासोबत छकडा आहे पण घोडा (अथवा बैलही) पुरलेला नाही. आणि महत्वाची बाब म्हणजे मध्य आशियातील दफनांतील रथांची संरचना सिनौलीच्या छकड्यांप्रमाणे नसून सर्वस्वी वेगळी तर आहेच पण चाकेही भरीव नसून आरे असलेली आहेत. भरीव चाकांचे रथ जगात कोठेही नसतात कारण वजन वाढते. त्यामुळे सिनौली येथील सापडलेल्या भरीव चाकाच्या गाड्यांना युद्धात वापरले जाणारे वेगवान रथ ठरवायचा प्रयत्न करणे हा सामान्य ज्ञानाचाही भाग नसल्याचे चिन्ह आहे.
मंजुळ मात्र ठासून सांगतात कि सिनौली येथील दफने वैदिक पद्धतीची आहेत. हेही धादांत असत्य यासाठी आहे कि शवपेटीत दफन करण्याचा एकही उल्लेख वैदिक साहित्यात नाही. पण उत्तरसिंधू काळात मात्र अशी दफने आढळलेली आहेत. ऋग्वेदात रथांचे जेही उल्लेख आहेत ते आ-यांच्या चाकांच्या रथांचे आहेत, भरीव चाकांचे नाहीत. सिंधू संस्कृतीत इसपू ३१०० पासून भरीव चाकांच्या बैलगाड्यांचाच वापर होत असल्याचेही पुरावे उपलब्ध आहेत. शिवाय सिनौली येथे जी मृद्भांडी, अलंकार, बैलाचे मस्तक व पिंपळपानाच्या आकृती मिळाल्या आहेत त्याही सिंधू संस्कृतीत मिळणा-या अवशेषांशी मेळ खातात. म्हणजेच सिंधू संस्कृतीचा विस्तार गंगेच्या खो-यापर्यंत झाल्याचा पुरावा सिनौली येथील अवशेष देतात. वैदिक संस्कृती तेथे अस्तित्वात असल्याचा नाही हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
दुसरी बाब म्हणजे सिनौली येथील मृतांचा महाभारत युद्धाशी संबंध असल्याबद्दलचा दावा. हे अवशेष सापडले तो परिसर कुरुक्षेत्राचा भाग मानला जातो. आता महाकाव्यातील युद्धाची आणि या अवशेषांची सांगड घालून युद्ध तर खरेच झाले पण ही क्षत्रियांची शाही दफने आहेत असा दावा वैदिक धर्माभिमान्यांनी करणे स्वाभाविक मानले तरी ते हे विसरतात कि या दफनांतील सांगाडे हे युद्धात मेलेल्यांचे नसून नैसर्गिक मरण आलेल्यांचे आहेत. या दफनांत एक वर्षाच्या मुलापासून ते वृद्ध स्त्री-पुरुषांचेही सांगाडे सामाविष्ट आहेत. दुसरे म्हणजे दफनात तलवारी वगैरे शस्त्रे सापडली असली तरी धनुष्यबाणाचा एकही पुरावा सापडलेला नाही. भारतयुद्धात तर धनुष्य हेच मुख्य साधन वापरल्याचे उल्लेख आहेत. मग त्या मृतांचा संबंध महाभारत युद्धातील मृतांशी कसा लावता येईल?
सिनौली येथील दफनभूमी ही ताम्रयुगीन आहे. लोखंडाचा शोध तोवर लागलेलाच नव्हता. पण ऋग्वेदाला लोखंड माहित होते म्हणजे ऋग्वेद लोहयुगात, (इसपू १५०० नंतर) लिहिला गेला. तरीही सिनौली येथील अवशेषांचा संबंध वैदिक आर्यांशी जोडत त्यांना येथलेच ठरवायचा प्रयत्न करणे अशास्त्रीय व वर्चस्वतावादी धोरणाचा परिपाक आहे.
उलट सिनौली येथील अवशेष आपल्याला ओरडून सांगत आहेत कि सिंधू संस्कृतीचा विस्तार समजला जातो तेवढाच नसून ती गंगा-यमुनेच्या खो-यापर्यंत किंवा त्याही पार पसरलेला होता. तीत काही स्थानिक वैशिष्ट्येही होती. गंगा-यमुनेच्या दोआबात राहणा-या पुरातन जमातींनी ती आपली स्वतंत्र वैशिष्ट्ये आपल्या दफनपद्धतीत कायम ठेवली. त्या काळात जगभरातील सर्व जमातींना संरक्षण-आक्रमणासाठी युद्धसज्ज रहावेच लागे. किंबहुना तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असे. दफनांत शस्त्रे सापडली म्हणून त्यांना लगेच वैदिक क्षत्रीय ठरवायचा बादरायणी प्रयत्न संघीय विद्वान करू धजत असले तरी तज्ञांनी तसे करणे अक्षम्य आहे. यामुळे सिनौलीच्या अवशेषांचा खरा अन्वयार्थ समजून घेतला जाणार नाही. आपले प्राचीन पूर्वज आणि त्यांच्या जगण्याच्या पद्धतीवर खरा प्रकाश पडणार नाही. लबाड्या करून वर्चस्ववादी बनता येईल पण ज्ञानपरंपरेची अक्षम्य हानी होईल!
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment